कोल्हापूरचे महापौरपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. महापौर निवडीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांत आघाड्यांची नोंदणी, गटनेता निवड आणि उमेदवारीवरून धावपळ सुरू झाली आहे.
जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराचा धुरळा उडत असतानाच दुसरीकडे महापौर निवडीच्या तयारीने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
आरक्षणाची घोषणा होताच पक्षांतर्गत खलबत्त्यांना उधाण आले. शुक्रवारी भारतीय जनता पार्टी, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या स्वतंत्र बैठका होणार असून, यामध्ये गटनेत्यांची निवड निश्चित केली जाणार आहे. काँग्रेसने मात्र महापौर निवडीची अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतर बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडीच्या सभेपूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असून, यंदा आघाड्यांची नोंदणी करताना निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवकाला विभागीय आयुक्तांसमोर हजर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ही प्रक्रिया राजकीय पक्षांसाठी अधिक गुंतागुंतीची व डोकेदुखी ठरत आहे. अनेक नेते जिल्हा परिषद निवडणुकांत व्यस्त असतानाच महापौर निवडीची लगबग सुरू झाल्याने समन्वयाचे आव्हान आहे.
भाजपातून विजयसिंह खाडे-पाटील, रूपाराणी निकम, वैभव कुंभार, प्रमोद देसाई, विजय देसाई यांच्यासह डझनभर नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून अजय इंगवले व अश्कीन आजरेकर ही नावे नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडून आल्याने आघाडीवर आहेत. याशिवाय सर्वसाधारण प्रवर्गातून दोन वेळा निवडून आलेल्या संगीता सावंत यांच्यासह मागास प्रवर्गाचे दाखले असलेले काही नगरसेवकही शर्यतीत उतरू शकतात.
राष्ट्रवादीत आदिल फरास यांचे नाव निश्चित
राष्ट्रवादी काँग्रेसची गुरुवारी बैठक झाली. गटनेता निवडीसाठी शुक्रवारी पुन्हा बैठक होणार असून, त्यात आदिल फरास यांची गटनेता म्हणून निवड निश्चित मानली जात आहे.
भाजप कार्यालयात सकाळी 11 वाजता बैठक
भाजपच्या कार्यालयात शुक्रवारी सकाळी 11 वाजता नगरसेवकांची बैठक होणार आहे. आघाडी नोंदणी व आवश्यक कागदपत्रांची पूर्ततेच्या सूचना दिल्या जाणार असून, गटनेताही निवडला जाणार आहे. पक्षश्रेष्ठींनी तिघांची नावे सुचवली असून, रूपाराणी निकम, विजयसिंह खाडे-पाटील व मुरलीधर जाधव यांच्यातून गटनेता ठरणार आहे.
शिवसेनेची ‘शिवालया’त खलबते
शिवसेनेची बैठक शुक्रवारी सकाळी शिवालयात होणार आहे. त्यात गटनेत्याच्या नावावर अंतिम निर्णय होणार असून, शारंगधर देशमुख यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.





