भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठे बदल केले असून, यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘तिकीट विंडो उघडताच काही सेकंदात तिकीट संपते’ अशी तक्रार प्रवाशांकडून सातत्याने केली जात होती.
या पार्श्वभूमीवर रेल्वेने काही महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत.
रेल्वेच्या नव्या नियमानुसार आता फक्त व्हेरिफाय IRCTC अकाउंटमधूनच तत्काल तिकीट बुक करता येणार आहे. यासाठी प्रत्येक प्रवाशाला आपले IRCTC खाते आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक असेल. अपूर्ण माहिती असलेली किंवा आधारशी लिंक नसलेली खाती तत्काल बुकिंगच्या वेळी आपोआप ब्लॉक केली जाणार आहेत.
तिकीट बुक करताना प्रवाशाने दिलेली माहिती ही आधार किंवा अधिकृत सरकारी ओळखपत्राशी जुळणारी असणे आवश्यक असावी. त्यामुळे बनावट नावांनी तिकीट काढणे आणि नंतर ते जास्त दराने विकणे या गैरप्रकारांना आळा बसणार आहे.
तांत्रिक पातळीवर मोठे बदल
रेल्वेने तिकीट बुकिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऑटो-फिल सॉफ्टवेअर, स्क्रिप्ट्स आणि बॉट्ससाठी अत्याधुनिक तांत्रिक फिल्टर्स बसवले आहेत. त्यामुळे काही सेकंदांत सर्व तिकीट बुक होणारे सॉफ्टवेअर आता चालू शकणार नाही.
प्रवाशांची आणखी एक मोठी तक्रार म्हणजे पेमेंट फेल होणे. नव्या प्रणालीत पेमेंट गेटवे अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यात आले असून, तिकीट रद्द होण्याचा धोका आता कमी होणार आहे.
एजंटवर कडक लक्ष ठेवणार
तत्काल विंडो सुरू होताच एजंटकडून होणाऱ्या बुकिंगवर कडक लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठी नवीन ट्रॅकिंग सिस्टीम आणि निर्बंध लागू करण्यात आले आहेत, जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना प्राधान्य मिळेल.
प्रवाशांनी काय करायला हवं?
रेल्वेने सांगितलं की, ज्यांचे IRCTC प्रोफाइल आधीच अपडेट आहे आणि आधारशी लिंक आहे, अशा प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता आता पूर्वीपेक्षा जास्त आहे. प्रवाशांनी बुकिंगपूर्वी इंटरनेट कनेक्शन, प्रोफाइलची माहिती आणि लॉग-इन तपशील तपासून ठेवावेत, असा सल्लाही देण्यात आला आहे.






