राजारामपुरी येथील मध्यवर्ती शाहू मिल चौक – कोटीतीर्थ तलाव रोडवर झालेल्या भीषण अपघाताला मोटार चालक मयुरेश योगेश पाटील (19, रा. आठवी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर) याचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे पोलिस चौकशीत रविवारी स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांची प्रकृती स्थिर असून प्रकृतीचा धोका टळला आहे. अपघातप्रकरणी अटक केलेल्या तरुणाला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
शाहू मिल चौकात शनिवारी दुपारी चालकाचे नियंत्रण सुटलेल्या भरधाव मोटारीने मोपेडस्वारांना चिरडल्याने अॅड. भाग्यश्री लक्ष्मण गवळी (30, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) व त्यांचे वडील दीपक सहदेव वंशे (62, रविवार पेठ, सणगर गल्ली, कोल्हापूर) यांचा जागीच मृत्यू झाला; तर मोटारीखाली चिरडल्याने कैवल्य उदय नाईक (23, रा. तस्ते गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर) आणि धनंजय बबनराव करजगार (44, गुजरी कॉर्नर, कोल्हापूर) हे गंभीर जखमी झालेे. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना राजारामपुरी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.
अपघातप्रकरणी शनिवारी रात्री मोटारचालक मयुरेश पाटील याच्याविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्यास अटक केली. रात्री उशिरा त्याची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी संशयित तरुणाकडे शनिवारी रात्री उशिरा तसेच रविवारी सकाळी सखोल चौकशी केली. संशयिताने दिलेल्या माहितीनुसार राजारामपुरी येथील आठव्या गल्लीतील बंगल्यातून मयुरेश शनिवारी (दि. 7) दुपारी 3.15 वाजता आलिशान मोटार घेऊन बाहेर पडला. राजारामपुरी येथील जनता बझार चौकातील कोपर्यावर भरधाव मोटारीने रिक्षाला धडक दिली. या गोंधळात मोटारीचा आणखी एका दुचाकीला धक्का लागला.
रिक्षाचालकासह दुचाकीस्वार जोरात ओरडला. मोटार थांबविण्यास त्यांनी मयुरेशला सांगितले. यावेळी आरडाओरड झाल्याने मयुरेशने आपणाला चौकात मारहाण होईल, या भीतीने त्याने मोटार भरधाव पळविली. शाहू मिल चौकाच्या दिशेने जात असताना कोणी तरी आपला पाठलाग करीत असावा, अशी शक्यता गृहित धरून त्याने चौकाला वळसा घालतानाही मोटारीचा वेग वाढविला. परिणामी त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. चुकीच्या दिशेने कोटीतीर्थ तलावाच्या दिशेने जाणार्या मोटारीने तीन मोपेडस्वारांना जोरात चिरडले. त्यात अॅड. भाग्यश्री गवळी, दीपक वंशे, कैवल्य नाईक व धनंजय करजगार गंभीर जखमी झाले.या दुर्घटनेत बापलेकीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले.
पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी रविवारी सायंकाळी तपासाधिकारी सतीश होडगर यांच्याकडून आढावा घेतला. संशयिताला तीन दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे. चौकशीत सर्व बाबी स्पष्ट होतील, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले. अपघात होताना मोटारीत मयुरेशसह आणखी कोणी साथीदार होते का, याचीही चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले. शाहू मिल चौक-कोटीतीर्थ तलाव रोडवर झालेल्या भीषण अपघाताची सखोल चौकशी केली जात आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या चालकावर कठोर कारवाई होईल, असेही गुप्ता यांनी सांगितले.
प्रतीक्षा वैद्यकीय अहवालाची
वैद्यकीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अपघातावेळी संशयित चालकाची मानसिक स्थिती काय होती, याचा उलगडा होईल, असे पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सांगितले.





