पालक आपल्या मुलांना विश्वासाने शाळेत पाठवतात, परंतु सातारा (incident) जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मलकापूर येथे घडलेल्या एका प्रकारामुळे हा विश्वास हादरला आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आपल्या शाळेतील शिक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित शिक्षकाने तिला वर्गाबाहेर बोलावले. भीती वाटल्याने ती तीन मैत्रिणींना सोबत घेऊन बाहेर गेली; मात्र शिक्षकाने इतर मुलींना परत पाठवून तिला थांबवले. त्यानंतर “मी तुला चार दिवस बोलावत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाइन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो,” असे म्हणत तिचा हात पकडल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. घाबरलेल्या मुलीने हात झटकून वर्गात धाव घेतली आणि नंतर संपूर्ण प्रकार मैत्रिणी व कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी तात्काळ कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे घडलेल्या (incident) आणखी एका घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महालक्ष्मी नगर परिसरातील एका खासगी रुग्णालयात सहा वर्षांच्या मुलावर चुकीचे उपचार झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रकृती बिघडल्याने मुलाला पुढील उपचारांसाठी मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संबंधित महिला डॉक्टरवर हलगर्जीपणाचे आरोप करण्यात आले. तक्रारी, आंदोलन आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरने आठवडाभरापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या उल्हासनगरमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही घटनांमुळे शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेतील जबाबदारी, सुरक्षितता आणि विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.





