महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरली. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं म्हटलं.
त्यामुळेच ही योजना निवडणुकीत गेमचेंजर ठरली आणि महायुतीने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला. पण निवडणुकीनंतर या योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांना पैसे दिले जाण्याचं सरकारने म्हटलं. इतकेच नाही तर त्यासाठी ईकेवायसी प्रक्रिया सुद्धा अनिवार्य करण्यात आली.
ई-केवायसीमध्ये दुरुस्तीस मुदत
ई-केवायसी करताना अनेक महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर सरकारने ईकेवायसीमध्ये दुरुस्ती करण्यास मार्च महिन्यापर्यंत मुदत दिली. त्यामुळे ईकेवायसीमध्ये चुकू झाली असल्यास एक दुरुस्तीची संधी लाडक्या बहिणींना मिळाली.
योजनेबाबत संभ्रम
लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा हप्ता दिला जातो. पण गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरिस लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला. पण आता मार्च महिना उजाडला आहे तरी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला नाहीये. त्यातच मंत्री गणेश नाईक यांनी या योजनेमुळे इतर खात्यांवर भार पडत असल्याचं म्हटलं. आधी विरोधक याबाबत विविध दावे करत होते. पण आता सरकारमधील मंत्र्यानेच विधान केले आहे. त्यामुळे योजना बंद तर होणार नाही ना? असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होऊ लागला.
फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. आता फेब्रुवारी महिना संपला असल्याने मार्च महिन्यातच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे. लवकरच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र मिळणार?
लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये मिळणार असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिला दिनाच्या निमित्ताने फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये सरकारकडून लाडक्या बहिणींना दिले जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. ही लाडक्या बहिणींसाठी एक खास भेट ठरू शकते. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.






