Sunday, March 22, 2026
Homeब्रेकिंगलाडक्या बहिणींची चिंता मिटली! अदिती तटकरेंनी दिली सर्वात मोठी गुड न्यूज

लाडक्या बहिणींची चिंता मिटली! अदिती तटकरेंनी दिली सर्वात मोठी गुड न्यूज

राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जातो.

 

मात्र, या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिला सुद्धा योजनेचा लाभ घेत असल्याच्या घटना समोर आल्या. इतकेच नाही तर काही पुरुष या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं. यानंतर राज्य सरकारने लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य केले.

 

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी राज्य सरकारने मुदतवाढ सुद्धा दिली होती. मात्र, ई-केवायसी प्रक्रियेत काही असे प्रश्न होते ज्यामुळे लाडक्या बहिणींनी गोंधळून चुकीचा पर्याय निवडला. यानंतर केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने लाडक्या बहिणींना एक संधी दिली. ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 आहे. ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात येणार आहेत.

 

मात्र, योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतून लाडक्या बहिणींची नावे वगळण्यापूर्वीच एक वृत्त आलं आणि खळबळ उडाली. माध्यमांमधील वृत्तात दावा करण्यात आला की, योजनेतून तब्बल 90 लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहेत.

 

माध्यमांच्या वृत्तानुसार, जुलै 2024 मध्ये जेव्हा मुख्यमंत्री माझी लडकी बहिण योजना सुरू करण्यात आली, तेव्हा लाभार्थ्यांची संख्या 1.52 कोटी होती. मात्र, आता पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 1.53 कोटींपर्यंत कमी झाली आहे. या वृत्तात असेही म्हटले आहे की, सरकारने उत्पन्न मर्यादा आणि इतर पात्रता निकषांच्या आधारे लाखो महिलांना या योजनेतून वगळले आहे.

 

असे वृत्त आहे की, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न ₹2.5लाखांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे, त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. यामुळे सरकारी तिजोरीची अंदाजे ₹ 17,000 कोटींची बचत होईल. या वृत्ताने एकच खळबळ उडाली. इतक्या मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची नावे वगळल्याच्या वृत्ताने लाडक्या बहिणी गोंधळात पडल्या. योजनेतून आपले नाव तर वगळले नाही ना? असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला.

 

राज्य सरकारचे स्पष्टीकरण

 

या वृत्तावर राज्य सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. सध्या अशी कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, असे म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारमधील महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या वृत्तांवर प्रतिक्रिया दिली आहे. अदिती तटकरे यांनी हे वृत्त फेटाळले असून लाडक्या बहिणींची चिंता दूर केली आहे.

 

 

नेमकं काय म्हणाल्या अदिती तटकरे?

 

मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या कपातीबाबत काही माध्यमांकडून प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या व तथ्यहीन आहेत. दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना E-Kyc करण्याची संधी देण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. या संदर्भात कोणतेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी माध्यमांनी तथ्यांची पडताळणी करावी ही नम्र विनंती.”

 

मंत्री अदिती तटकरे यांनी योजनेच्या संदर्भातील वृत्तांवर स्पष्टीकरण दिलं आहे. या स्पष्टीकरणामुळे लाडक्या बहिणींची चिंता मिटली आहे. 31 मार्च पर्यंत ई-केवायसी दुरुस्तीची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ज्या महिलांनी ई-केवायसी दुरुस्ती केलेली नाहीये अशा महिलांनी तात्काळ दुरुस्ती करावी. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता सरकारकडून येणाऱ्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -