राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होताना दिसत आहे. सूर्य आग ओकत आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 4३ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. देशभरात वातावरण बदलताना दिसत आहे. कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आज राज्यात मोठा अलर्ट जारी केला. आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. दुपारी 12 ते 4 नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. यासोबतच जास्तीत जास्त पाणीही प्यावे. आज उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. प्रशासनाकडूनही नागरिकांना सूचना देण्यात आल्यात. अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोला येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमान होते. आज नाशिक, जळगाव, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, अमरावती, अकोला, वर्धा, नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राच्या वतीने नांदेड जिल्ह्याला 14 आणि 15 मे रोजी उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, नांदेडमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येलो अलर्टच्या अगोदरच्या दिवशी नांदेडचे तापमान 41 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले. वाढत्या तापमानामुळे नांदेडकर हैराण झाले आहेत.
जळगावच्या ममुराबाद येथील वेधशाळेकडून 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. जळगावच्या तापमानात गेल्या दोन दिवसात अडीच ते तीन अंशांनी वाढ. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत उष्णतेच्या झळा आणि प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले.
चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मे महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला असून आगामी काळा उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेकडून उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. हिट स्ट्रोकचा प्रभाव जाणवल्यास तात्काळ उपचार मिळावेत यासाठी कोल्ड रूमची व्यवस्था करण्यात आली आहे.




