अहिल्यानगरात शिर्डी-नाशिक महामार्गावर एसटी बस आणि एर्टिगा कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. अवघ्या काही सेकंदांत झालेल्या या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तब्बल 15 जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे अहिल्यानगरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नेमकी काय माहिती समोर आली?
मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. राज्य परिवहन महामंडळ बस आणि एर्टिगा कार यांच्यात हा अपघात झाला आहे. अपघातात एक जण ठार तर 15 जण जखमी झाले आहेत. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. तर एसटी बसचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात एवढा भीषण होता की कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात दोन्ही वाहनांमधील एकूण 15 जण जखमी झाले आहेत.
जखमी तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल
शिर्डी जवळील सावळीविहीर हद्दीत अपघाताची ही घटना घडली आहे. अपघातग्रस्त बस पनवेलवरून शिर्डीला जात होती. तर अपघातग्रस्त कार नाशिकला जात होती. अपघात झाल्याचे समजताच स्थानिकांनी तसेच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्यात साथ दिली.
दोन्ही वाहनं वेगात
हा अपघात एवढा भीषण होता की यात कारचा जागीच चक्काचूर झाला आहे. कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाल्याने ती कार खूप वेगात असावी, असा अंदाज लावला जात आहे. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. तत्पुर्वी जखमींवर उपचार केले जात असून मृतांचा आकडा वाढतो की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
वाहन चालवताना काय काळजी घ्यावी?
दरम्यान, वाहतुकीचे नियम न पाळल्याने तसेच वाहने चालवताना दुर्लक्ष केल्यानेच अशा प्रकारचे अपघात होतात. त्यामुळे प्रवाशांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. तसेच वाहने सावकाश चालवावीत. घाईत वाहन चालवल्यानेही अनेकदा अपघात होतो, असे सांगितले जात आहे.





