‘देऊळ बंद’ या चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील नकारात्मकता दूर करत सकारात्मक विचारांचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नागपुरात सांगितले.
चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात आशावाद आणि सकारात्मकता निर्माण व्हावी, हा या चित्रपटामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेल्या काळात ‘देऊळ बंद’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्यावेळी स्वतःचे मानधन आणि निर्मात्यांकडून मिळालेली रक्कम एकत्र करून सुमारे १९ लाख ७ हजार रुपयांची मदत गरजू शेतकरी कुटुंबांना करण्यात आली. विशेषतः आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दहा दिवस आधीच प्रवीण तरडे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत, ‘देऊळ बंद’ चित्रपटाच्या नफ्यातील प्रत्येक रुपया आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देणार असल्याचे जाहीर केले. प्रोडक्शन आणि प्रसिद्धीचा खर्च वजा केल्यानंतर उर्वरित संपूर्ण नफा समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भासह राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे सांगत, या समस्येकडे समाजाने अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे तरडे यांनी नमूद केले. महिलांमध्ये कुटुंबीय जबाबदाऱ्यांची जाणीव अधिक असल्याने त्या प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे उभ्या राहतात, असे निरीक्षणही त्यांनी व्यक्त केले.
‘आत्महत्या करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ हा सकारात्मक संदेश चित्रपटातून देण्यात येणार असून, अंधश्रद्धेपेक्षा कर्मावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा प्रेक्षकांना दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचे उदाहरण देत, पॅरालिसिससारख्या गंभीर आजारावर मात करून त्यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात सक्रिय योगदान दिले. त्यांच्या जिद्दीमधून कोणत्याही वयात आणि परिस्थितीत माणूस नव्याने उभा राहू शकतो, असा प्रेरणादायी संदेश मिळतो, असे तरडे यांनी सांगितले.
विविध सरकारांकडून प्रयत्न होऊनही शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नसल्याची खंत व्यक्त करत, ‘देऊळ बंद’ चित्रपटाच्या माध्यमातून समाजात जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. या चित्रपटामुळे आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि समाजपरिवर्तनाची दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





