पंढरपूरमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या जीआरमध्ये सुधारणा करण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. आज मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांची आंदोलनस्थळी जात भेट घेतली. यावेळी रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन दिले. यानंतर महाजन यांनी रोहित पवार यांच्यासमोर CM फडणवीस यांना फोन केला. यानंतर रोहित पवार यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आहे. आता रोहित पवार 22 जूनपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. 22 तारखेच्या आधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याच्या अटीवर उपोषण मागे घेतलं आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
गिरीश महाजन यांच्या भेटीवेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, 22 तारखेला अधिवेशन आहे. त्या आधी सरकार मिटिंग घेणार आहे. 30 जूनपासून कर्जमाफी लागू होणार आहे. जे बदल आहे, ते 30 जून आधी होणार आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात. आपल्याकडे थोडा वेळ आहे. आपण चर्चेला मुख्यमंत्र्यांकडे गेले पाहिजे का? चर्चेला राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे. हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर आणि ठाकरे गटाचे नेतेही असतील. शेकापचे जयंत पाटील असतील. महादेव जानकर असतील. सर्व शेतकरी नेते आहेत. चर्चा करू.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘दोनच छोट्या अटी आहेत. सरकार त्या ठेवणार नाही. पण त्यात गडबड झाली तर 4 जुलै रोजी मराठवाड्यात आंदोलन करू. बैठक ठरली आहे. मागण्यासमोर आहे. उगाच राजकारण आणून उपोषण लांबवून शेतकऱ्यांचं नुकसान करायचं नाही. रविकांत तुपकर उद्यापासून उपोषण सोडणार आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी तीन दिवस न लावता. उद्या किंवा परवाच त्यांना भेटावं.’
काय म्हणाले गिरीश महाजन?
गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांच्या भेटीवेळी म्हटले की, ‘राज्य सरकार सकारात्मक आहे. मोदी असतील किंवा फडणवीस असतील सर्व सकारात्मक आहे. वारंवार शेतकऱ्यांना कर्जमाफी का द्यावी लागते. तर शेतकरी अडचणीत असतो. त्यामुळे त्यांना कर्जमाफी देत असतो. शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्नही आपण सोडवत आहोत. रोहित पवार यांच्या मागण्यांबाबत बैठक बोलावली आहे. चर्चेतून तोडगा निघेल. मी रोहित पवार यांना विनंती करतो की त्यांनी आंदोलन मागे घ्यावं.





