देवदर्शनासाठी आलेल्या एका ३१ वर्षीय युवकाचा कृष्णा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज पहाटे नृसिंहवाडी येथे घडली. पाय घसरून नदीत पडल्याने हा अपघात झाला. मुळाराम खुशालाराम चौधरी (वय ३१, मूळ रा. रणीयासार, राजस्थान; सध्या रा. कापड मार्केट, इचलकरंजी) असे मृत युवकाचे नाव आहे.
सोमवारी पहाटे ते दर्शनासाठी शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे आले होते. पहाटे पावणे सहाच्या सुमारास कृष्णा नदीच्या घाटावर पायरीवर उभे राहून हात-पाय धुवत असताना, अचानक त्यांचा पाय घसरला. तोल जाऊन ते नदीच्या पात्रात पडले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. याबाबतची वर्दी खिमाराम जोगारामजी चौधरी यांनी शिरोळ पोलिसात दिली आहे.





