‘व्हाईट गोल्ड’ (White gold) विक्रीच्या नावाखाली गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,


सायलेन्सर वितळवून मिळालेल्या धातूची व्हाईट सोनं म्हणून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश कांदिवली पोलिसांनी केला आहे.


कांदिवली पोलिसांनी सांगितलं की 30 जुलै रोजी पोलिस स्टेशनमध्ये इक्को कारचे सायलेन्सर चोरीला गेल्याची तक्रार नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर समोर जे आलं ते सर्वांना चक्रावणारं होतं. या वाहनांचे सायलेन्सर वितळवून मिळालेल्या धातूला ‘व्हाईट गोल्ड’ असल्याचं सांगून त्याची विक्री करण्यात येत होती. या टोळाचा पर्दाफाश कांदिवली पोलिसांनी केला आहे.
कांदिवली पोलिसांनी सांगितलं की, आरोपी हे या परिसरातील इक्को कारचे सायलेन्सर चोरायचे आणि ते वितळवायचे. वितळण्यात आल्यानंतर मिळालेला धातू हा हुबेहुब प्लॅटिनमसारखा दिसायचा. तो धातू व्हाईट सोनं असल्याचं भासवून आरोपी याची विक्री 25 चे 30 हजारांमध्ये करायचे. बाजारात व्हाईट सोन्याची किंमत आता जवळपास 75 हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी आता तीन आरोपींना अटक करण्यात आली असून मुश्ताक गुल मोहम्मद शेख, सद्दाम हुसैन मोहम्मद सरीफ मनिहार आणि सुजीत यादव असं या आरोपींची नावं आहेत. हे सर्व आरोपी कांदिवली आणि मालाड मालवणी परिसरातील राहणारे असून सर्वजण गॅरजमध्ये कामाला आहेत. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. बनावट व्हाईट सोन्याची विक्री करणारे हे रॅकेट मोठं असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


त्या आधीही कांदिवली पोलिसात इक्को कारचे सायलेन्सर चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. पोलिसांनी या परिसरात अधिक तपास करता या प्रकरणाचा खुलासा झाला. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या या आरोपींनी कुणा-कुणाला याची विक्री केली आहे, किती प्रमाणात विक्री केली आहे याचीही माहिती पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Join our WhatsApp group