Homeमहाराष्ट्रफार्मर आयडीअभावी शेतकऱ्यांचे ५ हजार रुपये अडकले, ३० नोव्हेंबरचा उल्लेख करत बावनकुळेंचे...

फार्मर आयडीअभावी शेतकऱ्यांचे ५ हजार रुपये अडकले, ३० नोव्हेंबरचा उल्लेख करत बावनकुळेंचे महत्त्वाचे आवाहन

“राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) नसल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची मदत जमा झालेली नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत तो काढून घ्यावा,” असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. तसेच २० ते २२ लाख शेतकऱ्यांची पीक पाहणी करण्याची प्रक्रिया सुरू असून, शेतकऱ्यांनी केवायसीदेखील पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.

 

बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यात फार्मर आयडीची अडचण येत आहे. फार्मर आयडी नसल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३० तारखेपर्यंत फार्मर आयडी काढून घ्यावा. तसेच २० ते २२ लाख शेतकऱ्यांची पीक पाहणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात यापूर्वीच सूचना देण्यात आल्या असून, केवायसी करण्याबाबतही निर्देश यापूर्वीच प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.

 

दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेतली जात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. या बैठकीत चालू आठवड्यात आणि पुढील आठवड्यात कोणत्या उपाययोजना करायच्या, कोणत्या जिल्ह्यात परिस्थिती गंभीर आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोणते निर्णय घेता येतील, यावर चर्चा केली जात आहे, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चाची हाक दिली आहे. त्यांनीही दुष्काळ समितीच्या बैठकीला उपस्थित राहून आपली भूमिका मांडावी, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यास सकारात्मक आहे. मात्र, शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक संभ्रमात टाकणे आणि त्यांची मानसिक स्थिती कमकुवत करणे योग्य नाही. दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण होऊ नये. कोणतीही मागणी असल्यास सरकार बैठक घेण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले.

 

कोयना धरणाच्या पाण्याबाबत बोलताना त्यांनी राज्यातील वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा योग्य वापर करण्याची गरज असल्याचे सांगितले. राज्यातील शंभर टक्के वाहून जाणारे पाणी अडवणे आणि त्याचा योग्य वापर करणे, ही महत्त्वाची भूमिका आहे. कोयना प्रकल्प असो, जलविद्युत प्रकल्प असो किंवा नदी-नाल्यांचे पाणी असो, भविष्यात राज्याला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी हा प्रयोग महत्त्वाचा ठरणार आहे. वाहून जाणारे पाणी पुन्हा उपलब्ध करून ते शेतकऱ्यांना देता यावे, यासाठी सरकारने विविध प्रकल्प हाती घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

ड्रॅगन पॅलेसच्या विकासासाठी महसूल विभागाची जागा नगरविकास विभागाला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. जागेचे आरक्षण आणि इतर तांत्रिक बाबी तपासून अधिकृत हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ड्रॅगन पॅलेसच्या विकासासाठी राज्य सरकारकडून पुढाकार घेण्यात आला असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही रस्ते विकासासाठी मोठा निधी दिला आहे. मेट्रो स्टेशनला ड्रॅगन पॅलेसचे नाव देण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -