दूध दरात दोन रुपयांनी वाढ; महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेचा निर्णय!

राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने गायीच्या प्रति लिटर दूध विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.ही दरवाढ आजपासून (एक फेब्रुवारी) लागू होणार आहे.

संघटनेचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी दूरदृष्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील प्रमुख २२ खासगी आणि सहकारी दूध संस्थांची बैठक झाली. दूध खरेदी दर, दूध पिशवी पॅकिंग आणि वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. राज्यातील बाजारपेठेत परराज्यातील दूध संघांची विक्री वाढत आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी दूधच्या किरकोळ विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ एक फेब्रुवारीपासूनच लागू होणार आहे. दरम्यान, काही दूध संस्थांनी ग्राहकांवर बोजा पडू नये म्हणून मुख्य वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांचे कमिशन (सेवामूल्य) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही दूध संस्थांचे विक्री मूल्य स्थिर राहण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp group