Friday, March 29, 2024
Homeनोकरीअग्निवीर भरती प्रक्रियेत बदल, आता प्रथम..; १० फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी

अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल, आता प्रथम..; १० फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी

आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसकडून सैन्य दलातील अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत.अग्निवीर भरतीसाठी प्रथम लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच शारीरिक क्षमता चाचणी आणि मेडिकलसाठी बोलवले जाणार असल्याचे रिक्रूटमेंट ऑफिसने स्पष्ट केले आहे.

कोल्हापूरसह सात जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी १० फेब्रुवारीपासून अग्निवीरची ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होणार असून, एप्रिलमध्ये लेखी परीक्षा होणार आहे. या भरती प्रक्रियेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील उमेदवारांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. join indian army या संकेतस्थळावर ११ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. अर्जांची पडताळणी करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच शारीरिक क्षमता चाचणी आणि मेडिकलसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शारीरिक चाचणीची प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. त्याबद्दलची माहिती उमेदवारांना त्या-त्या वेळी संकेत स्थळावरून मिळेल, असे आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

९० हजारांतून ५३६ पात्र

शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर २२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२२ दरम्यान पार पडलेल्या अग्निवीर भरती प्रक्रियेचा निकाल २९ जानेवारीला सैन्य दलाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. भरती प्रक्रियेसाठी ९० हजार ऑनलाइन अर्ज आले होते. त्यापैकी ५३६ उमेदवार पात्र ठरले. यावरून येणाऱ्या भरती प्रक्रियेलाही तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळेल, असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे.

उमेदवारांमध्ये नाराजी

सैन्य दलातील जवानांच्या भरती प्रक्रियेत आजवर प्रथम शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा असेच स्वरूप होते. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेले उमेदवार लेखी परीक्षेला पात्र ठरत होते. आता मात्र शारीरिक क्षमता चांगली असूनही, आधी लेखी परीक्षा होणार असल्याने अनेक सक्षम आणि सुदृढ उमेदवारांना लेखी परीक्षा अडथळा ठरणार आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी आहे. गेली दोन वर्षे पोलिस भरतीतही असा बदल करण्यात आला होता. मात्र राज्यभरातून तीव्र विरोधामुळे पुन्हा पूर्ववत बदल करण्यात आले.

अग्निवीरसाठी पात्रता

वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे
शिक्षण – पदानुसार
ट्रेड्समन – ८ वी पास (४५ टक्के)
ट्रेड्समन – १० वी पास (४५ टक्के)
जनरल ड्युटी – १० वी पास (४५ टक्के)
टेक्निकल – १२ वी सायन्स पास (५० टक्के)
नर्सिंग – १२ वी सायन्स पास (५० टक्के)
लिपिक – १२ वी पास (कोणतीही शाखा) ६० टक्के

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -