त्या घटनेच्या विरोधात इचलकरंजी नगरपालिका कर्मचाऱ्यांची जोरदार निदर्शने…

ताजी बातमी/ऑनलाइन टीम इचलकरंजी नगरपरिषद सर्व कामगार क्रुती समितीच्या वतीने ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेचा जाहीर निषेध करुन जोरदार निदर्शने करण्यात आली.तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी ,अशा मागणीचे निवेदन समितीच्या वतीने प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांच्याकडे सादर करण्यात आले.

कोरोना महामारी व लाँकडाऊनच्या काळात शासनाबरोबरच प्रशासनातील अधिकारी ,कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यनिष्ठेने कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांना विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून गौरविण्यात येत आहे. अशी परिस्थिती असतानाच दुसरीकडे शासकीय अधिकारी व कर्मचा-यांवर प्राणघातक हल्ला करण्याचे प्रकार वाढून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकताच ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एकाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. इचलकरंजीत आज मंगळवारी सकाळी इचलकरंजी नगरपरिषद सर्व कामगार क्रुती समितीच्या वतीने पालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर कल्पिता पिंपळे यांच्यावरील प्राणघातक हल्याचा जोरदार घोषणाबाजी करत
जाहीर निषेध नोंदवत निदर्शने करण्यात आली. तसेच या घटनेतील हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर करावी ,अशी मागणी करण्यात आली.या निदर्शनाची माहिती मिळताच नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी ,पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी पालिकेत येवून नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.तसेच शासकीय अधिका-यांवरील भ्याड प्राणघातक हल्याचा निषेध नोंदवून संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी ,अशी मागणी केली.यावेळी जोरदार घोषणाबाजी करुन निदर्शने करण्यात आल्याने पालिका आवारात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.


यानंतर सदर घटनेतील हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी ,या मागणीचे निवेदन इचलकरंजी नगरपरिषद सर्व कामगार क्रुती समितीच्या वतीने प्रांत कार्यालयात नायब तहसिलदार उदयसिंह गायकवाड यांना देण्यात आले.


या निदर्शनामध्ये समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब कागले ,जनरल सेक्रेटरी के.के.कांबळे , उपमुख्याधिकारी केतन गुजर ,कामगार अधिकारी विजय राजापूरे , खजिनदार शिवाजी जगताप ,कामगार नेते ए.बी.पाटील ,नौशाद जावळे ,
अकौंटंट कलावती मिसाळ , नगर अभियंता संजय बागडे , आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनीलदत्त संगेवार , संजय कांबळे , विजय पाटील , शंकर तांबिरे ,शंकर अगसर ,दिलीप वडे , सूर्यकांत शेटे यांच्यासह पदाधिकारी ,सदस्य सहभागी झाले होते.

Join our WhatsApp group