Friday, March 29, 2024
Homeसांगलीसांगली : बेपत्ता व्यक्तीच्या हाडांचा सांगाडा वर्षाने शेतामध्ये सापडला

सांगली : बेपत्ता व्यक्तीच्या हाडांचा सांगाडा वर्षाने शेतामध्ये सापडला



शुक्रवारी मळणगाव हद्दीतील एका ऊसाच्या शेतामध्ये पुरुषाच्या हाडांचा सांगाडा सापडला. ही माहिती मिळताच कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. यावेळी हा सांगाडा सव्वा वर्षापुर्वी घर सोडून निघून गेलेल्या मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील अविनाश अशोकराव शिंदे वय ४२ या व्यक्तिचा असल्याचे निष्पन्न झाले.

सदर हाडांच्या सांगाड्याजवळ सापडलेली चप्पल, कपडे व तंबाखूच्या पुडीवरुन अविनाश शिंदे यांचा भाऊ सुनिल शिंदे यांनी हा सांगाडा अविनाश याचाच असल्याचे ओळखले. दरम्यान हाडांचा सापळा उत्तरीय तपासणी करण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी सांगितले.

मळणगाव येथे जमीन असणा-या गव्हाण (ता. तासगाव) येथील हणमंत दत्तू पवार यांच्या शेतातील ऊस तोडून बाहेर काढण्याचे काम कांही बिहारी मजूर करत होते. हे काम करताना शुक्रवारी दुपारी ऊसामध्ये एक मानवी कवटी सापडली तर तेथून कांही फूट अंतरावर हाडांचा सांगाडा सापडला. हा सांगाडा पाहून गर्भगळीत झालेल्या मजूरांनी याची माहिती जमीन मालक हणमंत पवार यांना दिली.

पवार यांनी याची खबर पोलिसांना देताच पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी तातडीने तिकडे धाव घेतली. तोपर्यंत गावातील लोकांचा जमाव सांगाडा पाहण्यासाठी जमा झाला होता. सांगाड्याजवळ पोहचताच पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी माहिती घेतली. गावातीलच अविनाश शिंदे ६ जून २०२० ला घरातून निघून गेले असल्याचे समजले. संबंधित व्यक्तिचा भाऊ सुनिल शिंदे यांना बोलावून घेण्यात आले.

हाडांच्या सांगाड्याजवळ सापडलेली चप्पल, तंबाखूची आणि चून्याची डबी आणि कपड्यांचे फाटलेले तुकडे यावरुन सदर सांगाडा आपल्या भावाचा असल्याचे सुनिल शिंदे यांनी ओळखले. या घटनेचा पंचनामा करुन सदरचा सांगाडा उप जिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळला पाठविण्यात आला.

घरापासून २०० मिटरवर सापडला सांगांडा
६ जून २०२० रोजी अविनाश शिंदे हे घर सोडून निघून गेले. याची फिर्याद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. कुटूंबीय व नातलगांनी अविनाशच्या सर्व मित्रांकडे जाऊन चौकशी केली. तरीही थांगपत्ता लागला नव्हता. १५ महिन्यापासून अविनाशचा शोध सुरु होता. काल त्याच्या हाडांचा सांगाडा सापडला ते ठिकाण घरापासून केवळ २०० मीटर अंतरावर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -