इचलकरंजी शहरात ऋतुराज कॉलनीने गणेशोत्सव पुरेपुर पर्यावरणपूरक संकल्पनांनी जपला.प्रत्येक कुटुंबाने घरात शाडूच्या गणेशमूर्तींची आरास केली.विसर्जनादिवशी या सर्व मूर्ती कॉलनीतच विसर्जित केल्या असून याचा वापर वृक्षांसाठी केला जाणार आहे.पर्यावरणपूरक विसर्जन करत न थांबता याचदिवशी कॉलनीत ट्री बेड तयार केला आणि 40 प्रकारचे वृक्ष व फुलझाडांचे रोपण प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या हस्ते केले.एखाद्या सणाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा विधायक संदेश या कॉलनीने दिला आहे.
इचलकरंजी शहरात गणेशोत्सव काळानुरूप बदलत आहे. मात्र आज साजरे होणारे गणेशोत्सव हे पर्यावरणाला हानीकारक ठरत आहेत. याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून त्याला सार्वजनिक रूप दिले.
गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे,अशी दरवर्षी शासन जनजागृती करते.याचे आचर ऋतुराज कॉलनीने केले हे कौतुकास्पद असल्याचे प्रांताधिकारी डॉ. खरात यांनी सांगितले.
कॉलनीत चाळीसहून अधिक कुटुंबे राहतात. यावर्षी प्रत्येकाने घरी शाडूची गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पर्यावरणपूरक पद्धतीने शाडूच्या गणेशमूर्तीची आरास केली. पाच दिवसांच्या घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनादिवशीही ऋतुराज कॉलनीने पर्यावरणाचे उत्कृष्ट पद्धतीने आरोग्य जपले आहे. एकाच ठिकाणी मोठा कृत्रिम कुंड तयार केले.
यामध्ये सर्व शाडूच्या मूर्तीचे विसर्जन केले.यातून उपलब्ध मातीचा वापर वृक्षारोपणासाठी केला जाणार आहे.पर्यावरण संकल्पनेमुळे नागरिकांचे आरोग्य जपले जाणार आहे.असाच प्रयत्न शहरातील प्रत्येक सोसायटी, कॉलनीत होणे गरजेचे आहे.जेणेकरून वाढता निसर्गाचा ऱ्हास थांबेल,असे मदन कारंडे यांनी सांगितले.पर्यावरण रक्षणासाठी पुढे येत कॉलनीतील सर्व कुटुंबानी विधायक पाऊल टाकले आहे.
स्वागत व प्रस्ताविक शीतल पाटील यांनी केले..यावेळी अध्यक्ष यशवंत कुलकर्णी, उपाध्यक्ष सुरेश कराळे, सेक्रेटरी नागेश पाटील, राजेंद्र पाटील, शीतल पाटील, बाळकृष्ण शिंदे,शिवाजी आडके, सुधाकर शिंदे ,सुनील म्हत्रे,विजय देसाई, उदय सावंत, संजय बागवडे, विनायक विभुते,श्याम जोशी, राजू पवार, परवेज मुजावर उपस्थित होते.