अंतराळ पर्यटनावर आज रवाना होणार चार प्रवासी



अवघ्या दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेला अंतराळ प्रवास आता नव्या उंचीवर पोहोचणार आहे. अ‍ॅलन मस्क यांची ‘स्पेस एक्स’ ही कंपनी उद्या (बुधवारी) चार लोकांसह आपले रॉकेट लाँच करणार आहे. पहिल्या दोन अंतराळ प्रवासापेक्षा हा प्रवास अनेक बाबतीत खास ठरणार आहे. पुन्हा वापरण्यात येऊ शकणारे फाल्कन-9 नामक रॉकेट बुधवारी पहाटे पाच वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) फ्लोरिडा येथील ‘केप केनरवेल’ येथून लाँच करण्यात येईल.

हवामानाबाबत काही समस्या निर्माण झाल्यास रॉकेट लाँच करण्यासाठी पाच तासांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. हे रॉकेट लाँच झाल्यानंतर ते प्रवाशांच्या क्रू व्हेईकलला वेगळे करेल. या व्हेईकलला ‘रेजिलिएन्स’ असे नाव देण्यात आले आहे. तीन दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर ‘रेजिलिएन्स’ हे अटलांटिकमध्ये उतरतील.

या अंतराळ पर्यटनाला ‘इन्स्पिरेशन-4’ असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकन ई-कॉमर्स ‘फर्म शिफ्ट-4’ पेमेंटसचे सीईओ जेरेड इसाकमन यांनी मुलांमधील कॅन्सरबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी तसेच सेंट ज्यूड चिल्ड्रेन्स रिसर्च हॉस्पिटलच्या मदतीसाठी या पर्यटन अंतराळ मोहिमेची परिकल्पना केली होती.

या मोहिमेत इसाकमन यांच्यासह भूशास्त्रज्ञ स्यान प्रोक्टर, हेली आर्सेनेक्स आणि एअरोस्पेस डाटा इंजिनिअर क्रिस सेंब्रोस्की हे अंतराळामध्ये पर्यटन करतील. या मोहिमेसाठी या चार जणांना गेल्या पाच महिन्यांपासून प्रशिक्षण देण्यात येत आहे. मोहीम जमिनीवरूनच नियंत्रित केली जाईल.

Leave a Reply

Join our WhatsApp group