Tuesday, March 19, 2024
Homeकोल्हापूरKolhapur : एसटी बस अंगावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार; प्रशांतचा मृतदेह पाहताच...

Kolhapur : एसटी बस अंगावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार; प्रशांतचा मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी फोडला हंबरडा

मोटारसायकलने मालवाहतूक टेम्पोला धडक दिली आणि मागून येणारी एसटी बस दुचाकीस्वारच्या अंगावरून गेली. यामध्ये दुचाकीस्वारस्वार जागीच ठार झालाप्रशांत संभाजी कांबळे (वय २३, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. यामध्ये आणखी दोघे दुचाकीस्वार जखमी झाले. ओंकार बाबासाहेब समुद्रे (वय २४) आणि गणेश देवदास समुद्रे (२४, दोघे रा. शिरोली पुलाची) अशी जखमींची नावे आहेत. कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिये फाटा येथे काल दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, प्रशांत कांबळे, ओंकार समुद्रे व गणेश समुद्रे हे तिघे जण एका दुचाकीवरून (एमएच ०९ बीजे ४६१७ ) सादळे-मादळे येथून पुलाची शिरोलीकडे निघाले होते. शिये फाटा येथे त्यांची मोटारसायकल माल वाहतूक टेम्पोस मागून धडकली. माल वाहतूक टेम्पो निघून गेला, मात्र मोटारसायकलवरील प्रशांत कांबळे हा महामार्गावर उजव्या बाजूला पडला.

त्यावेळी उजव्या बाजूने एसटी बस निघाली होती. प्रशांत महामार्गावर पडता क्षणी त्याच्या अंगावरून एसटीचे चाक गेले. यामध्ये तो जागीच ठार झाला. तर ओंकार व गणेश हे दोघे जखमी झाले. विरुद्ध दिशेला पडल्याने सुदैवाने ते बचावले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. प्रशांतच्या मागे आई, वडील आणि पाच विवाहित बहिणी आहेत. अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली. प्रशांत शिरोलीत फॅब्रिकेशनचे काम करीत होता. त्याची आई अंगणवाडी सेविका आहे. वडील खासगी कंपनीत काम करतात. अपघाताची माहिती मिळताच प्रशांतचे मित्र आणि कुटुंबीयांनी सीपीआरच्या अपघात विभागासमोर गर्दी केली. कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -