दारु पिताना कानाखाली लगावली, मित्राचा मृत्यू

मद्यपान करताना झालेल्या वादावादीनंतर मित्राला कानफटात मारली, पण त्याचा थेट मृत्यूच झाला. मुंबईतील कुर्ला परिसरात ही धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी एका 27 वर्षीय तरुणाला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपीने मद्यधुंद मित्राला थप्पड मारल्यानंतर मंगळवारी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

मद्यधुंद अवस्थेत झालेली वादावादी एका मित्राच्या जीवावर बेतली, तर दुसऱ्याला थेट तुरुंगवारी घडवणारी ठरली. आरोपी राहुल कांबळे आणि त्याचा मित्र अविनाश बालेकर सोमवारी एका इमारतीत मद्यपान करत बसले होते. यावेळी दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला, असे कुर्ल्यातील व्हीबी नगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपी राहुल कांबळेने अविनाश बालेकरला कानशिलात लगावली. त्यानंतर अविनाश बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांकडून त्याला मृत घोषित करण्यात आले.” अशी माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी थप्पड लगावणारा 27 वर्षीय आरोपी मित्र राहुल कांबळे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Open chat
Join our WhatsApp group