Thursday, March 28, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : आर.के. नगरात डेंग्यूने बालिकेचा मृत्यू

कोल्हापूर : आर.के. नगरात डेंग्यूने बालिकेचा मृत्यू

आर. के. नगर परिसरातील दिंडेनगर येथे डेंग्यूने सिद्धी विनायक पाटील (वय 4 वर्षे 3 महिने) या बालिकेचा मृत्यू झाला. तर किणी (ता. हातकणंगले) येथे एका मुलाचा मृत्यू झाला. डेंग्यूने जिल्ह्यात हातपाय पसरले असून जिल्हा आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

कोल्हापुरातील आर. के. नगर परिसरातील सिद्धीला ताप व उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. डेंग्यूसदृश लक्षणे असल्याने डॉक्टरांनी तातडीने तिच्या रक्ताचे नमुने घेऊन डेंग्यू तपासणी केली. यामध्ये सिद्धीला डेंग्यू झाल्यचे निष्पन्न झाले. उपचार सुरू असताना रविवारी दुपारी तिचा मृत्यू झाला.

किणी (ता. हातकणंगले) येथे डेंग्यूच्या डासांनी थैमान घातले असून यात 13 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. येथे 25 डेंग्यूबाधित रुग्ण सापडले आहेत. कसबा सांगाव येथे 21 तर कणेरी येथे 17 डेंग्यूबाधित रुग्ण आहेत. जिल्ह्यातील शिरोळ, गिरगाव, गारगोटी, इचलकरंजी, तिळवणी, कोगील खुर्द, निगवे, कागल, दौलतवाडी, पिंपळगाव, गगनबावडा, कोनवडे येथेही डेंग्यूबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच शहरातील आर. के. नगर, दौलतनगर, फुलेवाडी, साने गुरुजी वसाहत, साळोखेनगर मार्गावरील प्राध्यापक कॉलनी, शिवगंगा कॉलनी, बालाजी पार्क, जयहिंद नगर परिसरात डेंग्यू, चिकुनगुनियाचा ‘ताप’ चढला आहे.

दिवसेंदिवस डेंग्यू, चिकुनगुनियाच्या रुग्ण संख्येत वाढत असताना महापालिकेसह जिल्हा हिवताप कार्यालय मात्र सुस्त आहे. डेंग्यूमुळे जिल्ह्यातील दोन बालकांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामीण भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असताना येथील ग्रामसेवक, सरपंच सदस्य यांच्यासह स्वच्छता कमिटी सुस्त आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव वेळीच रोखला नाही तर जिल्ह्यात भयावह परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. डेंग्यू बाधित रुग्ण आढळणाऱ्या परिसरात अजून औषध फवारणी केली नसल्याचे नागरिकांतून सांगितले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -