सांगली : कैद्याचे पलायन; रक्षकांवर ठपका

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सांगली; जिल्हा कारागृहातून सुनील राठोड या कैद्याने पलायन केलेले प्रकरण अखेर दोन रक्षकांच्या अंगलट आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत रक्षकांनी कर्तव्यात कसूरपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लवकरच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.

तासगाव येथे जेसीबी चालकाचा खून केल्याप्रकरणी गेल्या वर्षभरापासून राठोड कारागृहात बंदी आहे. रविवारी सकाळी सफाईचे काम करण्यासाठी त्याला कारागृहातून बाहेर काढण्यात आले होते. कचरा टाकण्याचा बहाणा करून त्याने दवाखान्याजवळील भिंतीवरून उडी मारून पलायन केले होते. कारागृह प्रशासनाने या प्रकरणाचा अहवाल महानिरीक्षकांना सादर केला होता. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने येथे येऊन चौकशी केली.

राठोड ज्या भिंतीवरून उडी मारून पळून गेला, तेथील पाहणी केली होती. तसेच सीसीटीव्ही फुटेज कॅमेऱ्याची तपासणी केली होती. यामध्ये राठोड भिंतीवरून उडी मारून पळून गेल्याचे स्पष्ट दिसत होते. घटनेदिवशी केवळ दोनच रक्षक होते. एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते. याची संधी साधून राठोड पळून गेला. रक्षकांनी त्याच्यावर लक्ष ठेवण्याची गरज होती. पण त्यांनी निष्काळजीपणा करून कर्तव्यात
कसूरपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Join our WhatsApp group