Sangli : अव्वल कारकून लाचलुचपच्या जाळ्यात

कडेगाव येथील तहसीलदार कार्यालयातील सुनील दादासो चव्हाण (49, रा. अण्णाभाऊ साठे नगर, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) याला 10 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. चव्हाण याच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. चव्हाण यापूर्वी 2020 मध्ये 30 हजाराची लाच घेताना साडपला होता. त्यानंतर त्याला पुन्हा कामावर घेतल्यानंतर तो दुसऱ्यांदा लाचलुचपतच्या कारवाईत अडकला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी शेत जमिनीमधून जाणे-येणेसाठी गाडी रस्ता मंजूर करून देण्याबाबत तहसिलदार कार्यालय कडेगांव या ठिकाणी अर्ज दाखल केला होता. त्याप्रमाणे कडेगांव तहसिलदार कार्यालयात सुनावणी सुरू होती. तक्रारदार यांचे शेतजमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील कुळकायदा कलम 43 शर्त कमी करणेबाबत तक्रारदार यांनी तहसिलदार कार्यालय कडेगाव याठिकाणी अर्ज केला होता. सदर दोन्ही कामामध्ये मदत करण्यासाठी अव्वल कारकून सुनील चव्हाण यांने तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबतचा तक्रारी अर्ज 12 सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधकास मिळाला होता.

त्यानुसार ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये चव्हाण यांनी तक्रारदार यांची वरील दोन्ही कामामध्ये मदत करण्यासाठी प्रथम 15 हजार रूपये लाचेची मागणी करून चर्चेअंती 10 हजार रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी तहसिलदार कार्यालय कडेगांव या ठिकाणी चव्हाण यांचे विरूध्द सापळा लावण्यात आला होता. या सापळय़ात 10 हजार रूपये तक्रारदार यांचेकडून चव्हाण याने स्वीकारले नंतर त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. त्याच्याविरोधात कडेगाव पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरिक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार अविनाश सागर, सलीम मकानदार, सिमा माने, संजय संकपाळ, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, रविंद्र धुमाळ, संजय कलकुटगी यांनी केली आहे.

Join our WhatsApp group