बेपत्ता मानसी संदेश चौगुले (वय १३) या बेपत्ता मुलीचा मंगळवारी सांगलीत कृष्णा नदीत मृतदेह सापडला. दि. ७ सप्टेंबरपासून ती बेपत्ता होती. याबाबत भिलवडी पोलिस ठाण्यात नोंद झाली होती.
मानसी इयत्ता सातवीत शिक्षण घेत होती. ती गणेशोत्सवात पैसे खूप खर्च करीत होती. ही बाब तिच्या वडिलांना समजली होती. वडील आपल्याला जाब विचारतील. ओरडतील किंवा मारहाण करतील, अशी तिला भीती वाटत होती. त्यामुळे ती दि. ७ सप्टेंबर रोजी घरातून बाहेर पडली होती. रात्री उशिरा ती घरी परतली नाही. वडिलांनी तिचा शोध घेतला. परंतु, ती कुठेच सापडली नाही. वडिलांनी भिलवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. मानसीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी दुपारी कृष्णा नदीत मानसीचा मृतदेह सापडला. ती बेपत्ता असल्याची नोंद असल्याने रात्री उशिरा तिची ओळख पटली. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मानसीच्या घरापासून पन्नास फूट अंतरावर नदी आहे. तिथेच तिने उडी मारली असल्याचा संशय आहे.