कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेसला अखेर हिरवा कंदील; पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची झाली सोय

रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळूनही गेल्या दोन महिन्यांपासून शेडमध्येच थांबून असलेल्या कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेसला अखेर हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रचंड रेट्यानंतर शुक्रवारी 16 सप्टेंबर पासून ही विशेष एक्सप्रेस सुरू होत आहे. कलबुर्गी येथे रेल्वे राज्य मंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने एक्सप्रेसचे उद्घाटन होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या विशेष रेल्वेमुळे पंढरपूर, गाणगापूर आणि अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या शेकडो भाविकांची चांगली सोय होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर- सोलापूर मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णतः बंद झाली होती. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने विशेष एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांसह प्रवासी संघटनांकडून केली जात होती. तसेच सांगली, मिरज, कोल्हापूर या भागातून देवदर्शनासाठी पंढरपूर गाणगापूर आणि अक्कलकोट येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सोलापूर – मिरज सुपरफास्ट रेल्वेचा विस्तार करून ती कोल्हापूर-कलबुर्गी पर्यंत सोडावी अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात होती. त्याबाबत रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते. प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन 28 जुलै रोजी या रेल्वेचा विस्तार करून कोल्हापूरकलबुर्गी रेल्वे (गाडी क्रमांक – २२१५६) आणि कलबुर्गी – कोल्हापूर (गाडी क्रमांक – २२१५५) सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला होता.

मात्र सदरचा निर्णय होऊन दोन महिने लोटले तरीही प्रत्यक्षात कोल्हापूर – कलबुर्गी रेल्वे सुरू झाली नव्हती. याबाबत रेल्वे प्रवासी आणि संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाच्या अनास्तेमुळे प्रवाशांची गैरसोय निर्माण झाल्यामुळे याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू होता. अखेर रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर-कलबुर्गी ही विशेष एक्सप्रेस शुक्रवारी 16 सप्टेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कलबुर्गी येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या ऑनलाईन उपस्थितीत रेल्वे गाडीचा शुभारंभ होईल असेही रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सांगली, मिरज, कोल्हापूर या भागातून पंढरपूर, अक्कलकोट आणि गाणगापूर येथे देव दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

Join our WhatsApp group