Friday, March 29, 2024
Homeकोल्हापूरKolhapur : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे कोल्हापूर काँग्रेस थेट प्रक्षेपण करणार

Kolhapur : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे कोल्हापूर काँग्रेस थेट प्रक्षेपण करणार

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर कोल्हापूर काँग्रेसकडून लाईव्ह दाखवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या राहुल यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये आहे. कोल्हापूर काँग्रेस कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात स्क्रीनद्वारे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे थेट प्रक्षेपण करणार आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकात पोहोचली आहे. यात्रा 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारीतून सुरु झाली असून जम्मू आणि काश्मीरमध्ये तिची समाप्ती होणार आहे. एकूण 3,500 किमीचा प्रवास करून 12 राज्यांमधून ही यात्रा जाईल. संपूर्ण दौरा पूर्ण होण्यासाठी तब्बल 150 दिवस लागतील.

सात नोव्हेंबरला राहुल यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात

दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेडमध्ये प्रवेश करणार आहे. महाराष्ट्रात 16 दिवसांमध्ये 383 किमीचा प्रवास करणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून बेरोजगारी आणि ढासळलेली अर्थव्यवस्थेवरून भाजपवर हल्लाबोल करत आहेत.

काँग्रेसचे आमदार रुतुराज पाटील यांनी राहुल गांधी यांच्या स्वागताच्या नियोजनासाठी कोल्हापुरातील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. ते म्हणाले की, आम्ही यात्रेचे थेट प्रक्षेपण करू. आमचे नेते तरुण, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आवाज उठवताना लोकांना दिसले पाहिजे, असे आम्हाला वाटते. नागरिकांना आमची तत्त्वे आणि यात्रेची उद्दिष्टे कळावीत यासाठी आम्ही पत्रकेही वितरित करणार आहोत.

काँग्रेस युनिट 10 हजार काँग्रेस कार्यकर्त्यांची टीम गांधींच्या महाराष्ट्रातून त्यांच्या प्रवासात सामील होण्यासाठी पाठवेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात चार जागा जिंकून काँग्रेसने छाप पाडली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -