सैनिक टाकळीत ढगफुटी सदृश्य पाऊस ; घरांचे बनले तळे

सैनिक टाकळी येथे सुमारे सहा तासापेक्षा अधिक पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. यामुळे ओढे, नाले तुडुंब भरून घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. सणासुदीच्या दिवसात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने आनंदावर पाणी फिरले आहे. बालचमुना किल्ले तयार करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

तब्बल दीड ते दोन महिन्यापासून पावसामध्ये सातत्य असल्याने अनेक भागांत खरीप पिकांचं नुकसान झालं आहे, काही ठिकाणी पिकं वाहून गेली आहेत तर बऱ्याच ठिकाणी पिकंच पिक पाण्यात गेली आहेत. या वर्षी सोयाबीन, भुईमूग यासारखी नगदी पिके पुर्णपणे वाया गेली असुन शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसला आहे. या परिसरामध्ये साधारणपणे जून जुलै च्या दरम्यान ऊसाच्या आडसाली लागणी केल्या जातात. परंतु सततच्या पावसामुळे ऊस लागणीचाही खोळंबा झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आडसाली लागणी केल्या आहेत त्या ठिकाणी शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने

ऊसाच्या रोपांची वाढ खुंटली आहे. ऊस खोडवा पिकाच्या उत्पादनावरती ही मोठ्या प्रमाणात घट होणार आहे याचा परिणाम येणाऱ्या गळीत हंगामावर देखील होणार आहे. सध्या ऊस मजूर दाखल झाले आहेत. परंतु शेतामध्ये पाणी उभारल्याने ऊसतोड सुरु करणे अशक्य आहे. यामुळे कारखानदारांची देखील डोकेदुखी वाढणार आहे

विहिरी तुडुंब भरल्याने शेतामध्ये पाझर सुटलेला आहे. शासनाच्या पानंदरस्ता अंतर्गत रस्त्याची उंची वाढली असल्याने नैसर्गिक रित्या बाहेर पडणारे पाणी शेतामध्ये तुडुंब उभारले त्या ठिकाणची शेती खराब होण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर अनिल सुतार, बाबू बंण्णे यासारख्या शेतमजूर कुटुंबांच्या घरात पाणी साठल्याने त्यांचा संसार रस्त्यावर आला आहे.राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अशी मागणी लोक प्रतिनिधी सह शेतकरी वर्गातून होत आहे.

Join our WhatsApp group