विराट कोहली फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकलेला नाही. तो सातत्याने फेल होत आहे. द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतही तो फारशी चांगली चमक दाखवू शकलेला नाही. पण असे असले तरी त्याने केपटाऊन कसोटी सामन्यात फलंदाजी करताना राहुल द्रविडचा विक्रम मोडला आहे. भारतासाठी दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटीत सर्वाधिक धावा करणारा कोहली दुसरा फलंदाज ठरला आहे.
कोहलीने राहुल द्रविडला मागे टाकले आहे. विराटने आपल्या डावात 14 धावा पूर्ण करताच द्रविडचा विक्रम मोडीत काढला. द्रविडने दक्षिण आफ्रिकेत कसोटी खेळताना एकूण 624 धावा केल्या. त्याचवेळी, आता कोहलीच्या दक्षिण आफ्रिकेतील कसोटीत एकूण 625 धावा झाल्या आहेत. भारताकडून दक्षिण आफ्रिकेत कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तेंडुलकरने कसोटीत 1161 धावा केल्या आहेत. सचिनने 15 कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला.