खेड (ता. शिराळा) येथील मेंढराच्या कळपावर येथे दोन बिबट्यांनी मंगळवारी सायंकाळी हल्ला केला. या हल्ल्यात सहा कोकरे ठार झाली तर सहा जखमी झाली. सचिन सदाशिव माने, चंद्रकांत भीमराव वगरे, शंकर बापू कोळेकर, जगन्नाथ पांडुरंग शिरतोडे यांची ही मेंढरे आहेत.
शिवाजीराव खंडागळे यांच्या शेतात मेंढरांचा एक कळप बसवला होता. इतरे मेंढर चरावयास नेली होती. तळावर कोकरे लोखंडी जाळीच्या डालीखाली झाकून ठेवली होती.सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मेंढपाळ चंद्रकांत व सचिन हे दोघे तिथे आले. त्यावेळी दोन बिबटे दोन डालींजवळ कोकरांवर हल्ला करीत असल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्यांनी पळ काढला. मात्र, तोपर्यंत कोकरे ठार आणि जखमी झाली होती.
बिबट्यांच्या हल्ल्याची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक हणमंत पाटील, क्षेत्र सहायक बाबासाहेब गायकवाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ग्रामपंचायतीचे सदस्य अविनाश माळी, शशिकांत वगैरे, वैभव माळी, शुभम देशमुख, विश्वजित माळी उपस्थित होते.