राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयातील डॉक्टरांचे वेतन विहित कालावधीत अदा करणे आवश्यक आहे. त्यांच्या वेतनाला विलंब झाल्यास जबाबदार असणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय यांनी दिला आहे.
राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयातील डॉक्टरांचे, विशेषतः कंत्राटी पद्धतीने काम करणार्या डॉक्टरांचे वेतन थकीत राहण्याच्या घटना समोर येत आहेत. कोल्हापुरातील राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या दोन वर्षांत 3 वेळेला या घटना समोर आल्या.
कोरोना काळात पहिल्या आघाडीवर काम करणार्या डॉक्टरांचेच वेतन थकल्यामुळे दै. ‘पुढारी’ने यावर आवाज उठविला होता. या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. नुकत्याच झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सचिवांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे डॉक्टरांच्या वेतनविषयक प्रस्ताव पाठविण्यात दिरंगाई करणार्या प्रशासनाला चाप बसेल, अशी अपेक्षा आहे.