नाशिक जिल्ह्यात विद्यार्थिनींच्या एकामागोमाग एक आत्महत्या सुरूच आहेत. आता सुरगाणा येथे ऑनलाईन अभ्यासात अडचणी येत असल्याने एका अकरावीच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा हादरला असून, ऑनलाईन शिक्षण फायद्याचे की तोट्याचे असा प्रश्न पडला आहे. कोरोनाने सर्वात जास्त नुकसान विद्यार्थी आणि लहान मुलांचे झाले. शाळा आणि कॉलज सतत बंद असल्याने त्यांच्या अभ्यासात नाना विघ्न येत असल्याचे पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आले आहे.
अलंगुण येथील पोस्ट बेसिक अनुदानित आश्रमशाळेत ही विद्यार्थिनी अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती. सोमवारपासून पहिली ते बारावीचे वर्ग सुरू झाले. मात्र, या विद्यार्थिकडे स्वतःचा मोबाईल नव्हता. त्यामुळे ऑनलाईन क्लास आणि अभ्यासामध्ये ती इतर विद्यार्थ्यांपेक्षा मागे पडलेली होती. इतरांचा मोबाईल घेऊन ती ऑनलाईन क्लासेस करायची. मात्र, त्यानंतरही तिचा अभ्यास पूर्ण झाला नाही. त्यामुळे वाढलेला अभ्यास आणि सुरू झालेली शाळा याचा ताण तिला सहन झाला नाही. अखेर तिने सोमवारी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.