संतोष परब हल्लाप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी नितेश यांचा जामीनअर्ज फेटाळून लावला होता. नितेश यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवार, २७ रोजी सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी हे नितेश यांची बाजू मांडणार आहेत.
काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता; पण त्याचवेळी अन्य आरोपी मनीष दळवी याचा अटकपूर्व जामीनअर्ज मंजूर केला होता. परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. तसेच ही घटना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवण्यापूर्वी घडलेली आहे. त्यामुळे राजकीय सूड म्हणून नितेश यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही, असा दावा पोलिसांनी उच्च न्यायालयात केला होता. उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नितेश यांना जामीन देण्यास नकार दिला होता.