शेअर बाजारात आज गुरुवारी (दि.२७) हाहाकार उडाला. शेअर बाजाराचा सेन्सेक्स (Sensex) सकाळच्या सत्रात तब्बल सुमारे १ हजार अंकांनी कोसळला. तर निफ्टीची (Nifty) ३०० अंकांनी घसरण झाली. यामुळे बाजार सुरु होताच पहिल्या पाच मिनिटांत गुंतवणूकदारांना ३.८ लाख कोटींचा फटका बसला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर लवकरच वाढवण्याचे मिळालेले संकेत आणि परदेशी निधीचा ओघ यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरण झाली असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.
गेल्या सात सत्रांत सेन्सेक्सची झालेली घसरण ही एकूण ४,५०० अंकांची आहे. यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल २१ लाख कोटींचा फटका बसला आहे. १७ जानेवारी रोजी सेन्सेक्स ६१,३०८ अंकांवर होता. त्यानंतर २५ जानेवारीचा दिवस वगळता आतापर्यंतच्या सात सत्रांत सेन्सेक्स एकूण ४,४६८ अंकांनी घसरलाय. यामुळे बीएसई लिस्टेड कंपन्यांचे बाजारी भांडवल १७ जानेवारीच्या २८०.०२ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत आज २५८.७४ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे.