“नियंत्रण मंडळ हमारा नाम, प्रदूषण बढाना हमारा काम”, “मॅनेज अधिकाऱ्यांचा धिक्कार असो”, अशा घोषणांनी उद्योग भवन दणाणून सोडत भाजपने टाळा ठोको आंदोलनामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ आज (दि.२७) हादरून गेले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या गेटला कुलूप घालण्यासाठी पुढे सरसावले. त्यावेळी पोलीस व कार्यकर्ते यांच्यात जोरदार झटापट झाली. पोलीसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
६ जानेवारी २०२२ रोजी भाजप कार्यकर्त्यांनी, महानगरपालिकेकडे साठलेला व कुठलीही प्रक्रिया न केलेला कचरा बावडा परिसरातील शेतामध्ये पसरल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात त्याठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने व पर्यावरणाची कोणतीही काळजी न घेता कचरा टाकल्याचा उल्लेख केला होता.
वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या २१ दिवसात प्रदूषण मंडळाने यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे कारवाई न झाल्यास नियंत्रण मंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा भाजपने दिला होता. त्यानुसार आज विजय जाधव, अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, विजय खाडे -पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पदाधिकारी उद्योग भवनासमोर जमले आणि घोषणा देत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाकडे जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या गेटजवळ अडवले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली.