बाज- अंकले रस्त्यावर बेळुंखी हद्दीत (दि.२१जानेवारी) रोजी तरस मृतावस्थेत आढळून आले होते. वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला होता; परंतु चार दिवसांपूर्वी व्हायरल व्हिडीओमुळे या प्रकरणाचा छडा लागला. या प्रकरणी वन विभागाने वन्यजीव संरक्षक अधिनियम अंतर्गत बापू उर्फ महादेव मनोहर चव्हाण (वय.२४) याला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची वन कोठडी दिली आहे. अन्य संशयिताचा शोध सुरू आहे.
सद्यस्थितीत पश्चिम भागात वन्य प्राण्यांचा उपद्रव सुरू आहे. पोल्ट्रीधारक मेलेल्या कोंबड्या उघड्यावर टाकत असल्याने या कोंबड्या कुत्री मानवी वसाहतीजवळ आणून टाकत आहेत. परिणामी या कोंबड्या खाण्यासाठी तरस मानवी वसाहतीमध्ये वावर करत आहे. या तरसाने एका वृद्ध महिलेवर व शेळीवर हल्ला केला होता. एका घोड्याचे शिंगरू देखील फस्त केले होते.दरम्यान (दि.२१ जानेवारी, शुक्रवारी ) रस्त्यावर तरस मृतावस्थेत आढळून आले होते.