शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया दीर्घकाळ सुरु राहिल्याने विद्यार्थ्याने नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांचे हे शैक्षणिक व उपस्थितीचे नुकसान टाळण्यासाठी यंदा येत्या 30 सप्टेंबरपर्यंतच आरटीईअंतर्गत प्रवेश परीक्षा राबवण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्ष 2022-23मध्ये होणारी आरटीईअंतर्गत प्रवेश परीक्षा 30 सप्टेंबरपर्यंतच संपवण्यास सांगण्यात आले आहे. याबरोबरच सप्टेंबरनंतरही जागा रिक्त राहिल्या तरी प्रवेशाची प्रक्रिया बंद केली जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. तश्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अशी असेल प्रक्रिया येत्या 2022-23 च्या शैक्षणिक वर्षात आरटीईच्या 25 टक्के राखीव जागांसाठी एकदाच सोडत एकदाच सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर या सोडतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल. या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा लघुसंदेश पाठवला जाईल. पहिल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन जागा रिक्त राहिल्यास दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
संस्थांवर होणार कारवाई चालू वर्षापासून शाळांची नवीन नोंदणी करताना नव्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांत तीन वर्षांपर्यंत आरटीईचे प्रवेश देऊ नयेत. संबंधित शाळांची गुणवत्ता आणि सर्वसाधारण प्रवेश तपासून निर्णय घ्यावा. आरटीईची 25 टक्के राखीव जागांची प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या शाळांच्या नोंदणीची शिक्षणाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी. ज्या शाळा पात्र असूनही नोंदणी न करणाऱ्या किंवा 25 टक्के जागा उपलब्ध करून न देणाऱ्या शाळांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मागील काही दिवसांत आरटीई प्रवेश प्रक्रियेशी संबंधित काही अधिकारी-कर्मचारी करोनाबाधित झाल्याने प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या. मात्र शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून, पुढील काही दिवसांत शाळांची नोंदणी पूर्ण करण्यात येईल. तसेच प्रवेश प्रक्रिया मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.





