कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशांनुसार शिवाजी विद्यापीठ अधिविभाग व संलग्नित महाविद्यालये, शिक्षण संस्थांमधील लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे नियमित वर्ग 1 फेब्रुवारीपासून प्रत्यक्षरीत्या ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत. त्यामुळे पुन्हा महाविद्यालय कॅम्पस विद्यार्थ्यांनी गजबजून जाणार आहे.
विद्यापीठ अधिविभाग व संलग्नित महाविद्यालये, मान्यता प्राप्त शिक्षण संस्थांमधील नियमित वर्ग सुरू करणे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या दैनंदिन उपस्थितीबाबत प्रभारी कुलसचिव डॉॅ. व्ही. एन. शिंदे यांनी 28 जानेवारी रोजी परिपत्रक काढले आहे.
त्यानुसार विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 276 महाविद्यालये सुरू होणार आहेत. यात 2 लाख 60 हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दोन्ही डोस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. नियमित वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांची संमती घ्यावी.