सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाच्या स्ट्रीमिंगवर बंदी घालण्यास नकार दिला. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती जे.के माहेश्वरी यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला दिली आहे. याचिकाकर्त्याच्या मूलभूत अधिकाराचे हनन झालेले नाही. अशात अनुच्छेद ३२ अंतर्गत सुनावणी करता येणार नाही असे खंडपीठाने स्पष्ट केले.
महात्मा गांधी आणि गोडसेवर बनवण्यात आलेल्या चित्रपटाला सेंसर बोर्डाकडून मंजुरी मिळालेली नाही. असे असताना देखील चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. महात्मा गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला असून त्यांचे मारेकरी नाथूराम गोडसे यांचा गौरव करण्यात आला आहे. चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आल्यास यामुळे केवळ द्वेष पसरेल. चित्रपटच्या माध्यमातून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे.अशात चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती.