अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर जामिनावर सुटलेल्या आरोपीने तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा त्याच मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील एका गावात ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 21 वर्षीय आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी झाला होता. या प्रकरणात अटक झाल्यानंतर आरोपीची रवानगी तुरुंगात झाली. नुकताच तो जामिनावर सुटून बाहेर आला. त्यानंतर त्याने पुन्हा त्याच पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जात आहे. यातून गर्भवती राहिलेल्या पीडितेची प्रसुतीही झाली. परंतु सात महिन्यांच्या कालावधीनंतर बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी अखेर आरोपीवर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर जामिनावर सुटलेला आरोपी मयुर रमेश कोळी (वय 21 वर्ष) याने तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा त्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंध प्रस्थापित करुन आणि लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप होता. जळगावातील जामनेर पोलिसात या प्रकरणी आरोपीच्या विरुद्ध गुन्हाही दाखल आहे.