मोका कायद्याअंतर्गत कारवाईनंतर पसार झालेल्या आणि कुख्यात आर. सी. गँगमधील गुंड रवी सुरेश शिंदे (वय 30, रा. साळोखे पार्क, कोल्हापूर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रविवारी बेड्या ठोकल्या. वाठार फाटा येथे सापळा रचून त्यास अटक करण्यात आली.शहरात दहशत माजविणार्या आर. सी. गँगसाठी संशयित कार्यरत होता. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे सहा ते सात गुन्हे दाखल आहेत.
तीन महिन्यांपूर्वी प्रतिस्पर्धी टोळीचा म्होरक्या अमोल भास्कर याचा येथील पापाची तिकटी, महाद्वार रोड परिसरात भरदिवसा पाठलाग करून त्याच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. मोकाअंतर्गत कारवाईनंतर रवी शिंदे पोलिसांना चकवा देत पसार झाला होता. पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, विजय गुरखेसह पथकाने वाठार फाटा येथील एका ढाब्याजवळ सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. संशयित जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.