नोकरीची हमखास शाश्वती समजल्या जाणार्या बीएड अभ्यासक्रमाकडे गेल्या चार ते पाच वर्षांपासून भावी गुरुजींनी पाठ फिरवली आहे. यंदा प्रवेशासाठी 32 हजार 290 जागांपैंकी केवळ 8 हजार 806 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. त्यामुळे बीएड अभ्यासक्रमासाठी ‘कुणी विद्यार्थी देता का विद्यार्थी’ असे म्हणण्याची वेळ महाविद्यालयांवर आली आहे.
2012 पर्यंत बीएडची पदवी मिळताच तत्काळ शिक्षकाची नोकरी मिळत होती. शिक्षकाची नोकरी मिळाली की हमखास आर्थिक स्थैर्य मिळत होते. त्यामुळे लाखो विद्यार्थी पदवी परीक्षा झाल्यानंतर लगेचच बीएडला प्रवेश घेण्यासाठी गर्दी करीत होते. परंतु, राज्यात 2012 पासून शिक्षकभरतीला बंदी घालण्यात आली. त्यामुळे बीएड करून नोकरीची संधी उपलब्ध होणे बंद झाले. तसेच, बीएडची पदवी मिळाल्यानंतरही टीईटी सक्तीची करण्यात आली. त्यानंतर शिक्षकभरतीसाठी 2017 साली टीईटीसह अभियोग्यता चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.