शिवसेना कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांना आज बुधवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. काल मंगळवारी जामीन मिळावा म्हणून आमदार नितेश राणे यांचे वकील, ज्येष्ठ विधीतज्ज्ञ सतीश मानशिंदे, वकील संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला होता. तर सरकारी पक्षाच्या वतीने वकील प्रदीप घरत, वकील साळवी यांनी युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज निर्णय देतो असे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार आज जामीन अर्जावर निर्णय देण्यात आला.
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीतील भाजपचे आमदार नितेश राणे यांची गेल्या सोमवारी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.