सध्या भारतीय महिला क्रिकेट टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील एक दिवसीय मालिकेत एकूण पाच सामने खेळवण्यात येणार आहेत. यातील पहिल्या एक दिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाने भारतीय संघाचा ६२ धावांनी पराभव केला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना यजमान न्यूझीलंडने भारतीय संघाला २७५ धावांचे आव्हान दिले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ ऑल आऊट झाला. भारतीय संघाला २१३ धावांपर्यंत मजल मारता आली. यावेळी भारतीय कप्तान मिताली राजने केलेली अर्धशतकी खेळी भारताला विजयी करू शकली नाही. तिने ७३ चेंडूत ५९ धावा केल्या.
हा सामना न्यूझीलंडमधील क्वीन्सटाउन इव्हेंट सेंटर या मैदानावर खेळवण्यात आला. तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडच्या सलामीवीर फलंदाजांनी सुरूवातीपासून आक्रमक खेळीवर भर दिला.