कर्नाटकमधील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हिजाब घातल्याने मुस्लिम मुलींना प्रवेश नाकारल्याचा प्रकार घडला. त्यानंतर राज्यातील एका शैक्षणिक संस्थेवर भगवा झेंडा फडकवण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला. त्यामुळे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी काही प्रभावित शैक्षणिक संस्था एक आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा सल्ला दिला. याप्रकरणाचे मालेगावमध्येही पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने आंदोलन केले. मालेगावचे एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद यांनी ‘हिजाब डे’ पाळला. त्यानंतर त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते.
आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद म्हणाले की, रामांची पत्नी सीता. त्या काळात त्यांना पळवून नेण्यात आलं होतं. कित्येक वर्ष त्यांनी दुसऱ्याच्या कैदेत घालवली. मात्र, त्यांनी आपली आपली इज्जत, चारित्र्याचे ज्या पद्धतीनं रक्षण केलं, त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे हिजाब आणि पडदा होतं. त्याचं उदाहरण हे आहे की, त्यांचा दीर लक्ष्मणाला उभ्या राहिलेल्या स्त्रियांमध्ये सीता कोण हे ओळखायला सांगितलं. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं होतं की, मी आजपर्यंत माझ्या वहिणींचा चेहरा पाहिला नाहीय. कधीही नजर उठवून त्यांच्या चेहऱ्याकडं पाहिलं नाही. मी माझ्या वहिणीला पायावरून ओळखू शकतो. त्यांनी तिथं उभ्या असलेल्या स्त्रियांचे पाय पाहिले. त्यावरून आपल्या वहिणीला ओळखलं होतं. आमचा हा दावा आहे की, रामायण आणि हिंदू धर्मातही स्त्रियांना पडदा घालण्याचा आदेश आहे. आजही अनेक हिंदू घरांमध्ये महिला पदर डोक्यावर घेतल्याशिवाय दीर किंवा इतरांच्या समोर येत नाहीत. त्यांच्या या वक्तव्यावरून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेलीय.