कोल्हापूर विमानतळाचे काम प्राधान्याने पूर्ण केले जाणार आहे. यासाठी 223 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव असल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी मंगळवारी सांगितले. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने राज्यातील 87 प्रकल्पांबाबत मंगळवारी आढावा बैठक झाली. यावेळी कपूर यांनी ही माहिती दिली.
राज्यातील विमानतळ, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग आदी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयाशी संबंधित प्रकल्पांचा पंतप्रधान कार्यालयाने आढावा घेतला. सुमारे अडीच तास झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांच्यासह संबंधित विभागाचे प्रधान सचिव आणि राज्यातील 34 जिल्हाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर विमानतळाबाबत कपूर यांनी पंतप्रधान कार्यालयाला माहिती दिली. या विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. धावपट्टी विस्तारीकरणासाठी अतिरिक्त 64 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून 223 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. कोल्हापूर विमानतळ कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असून येत्या वर्षभरात विमानतळाच्या विस्तारीकरणाची सर्व कामे पूर्ण होतील, असेही ते म्हणाले.