मागील अनेक दिवसांपासून राज्यव्यापी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे गेले अनेक दिवस एसटी सेवा ठप्प झाली आहे. वाहतूक सेवा पुर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने (MSRTC) एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाकडून 1225 खासगी चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासगी चालकाच्या मदतीने महाराष्ट्रभर नऊ हजार एसटी फेऱ्या सुरू केल्याचा दावा महामंडळाने केलाय. दरम्यान आगामी काही दिवसामध्ये आणखी काही अशा चालकांची नियुक्ती करणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
महामंडळाच्या जनसंपर्क विभागाने सांगितलं की, “परीक्षाकाळात विद्यार्थी वाहतूक सुरळीत राहावी तसेच, कोरोना नियंत्रणात आल्याने राज्यातील नागरिकांची प्रवासासाठी वाढलेली मागणी पाहता महामंडळात खासगी चालकांची नियुक्ती केली जातेय. जानेवारीमध्ये खासगी चालकांच्या नियुक्तीसाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार नियुक्ती प्रक्रिया सुरू करून 1225 खासगी चालकांची नियुक्ती केली गेलीय. त्याचबरोबर वाहतुकीची गरज लक्षात घेऊन त्याचा आढावा घेतल्यानंतर आणखी खासगी चालकांची नियुक्ती करण्यात येईल.”
दरम्यान, “एसटी संपापूर्वी राज्यात 94 हजारांहून अधिक एसटी फेऱ्या सुरू होत्या. मात्र संपामुळे सध्या 9 हजार 636 फेऱ्या सुरू आहेत. त्याचबरोबर 249 आगार अंशत: सुरू करण्यात आले आहेत. असं एसटी महामंडळाने सांगितलं आहे. दरम्यान, विलिनीकरणाच्या मागणीवर निर्णय होईपर्यंत कर्मचारी संपावर ठाम आहेत. 64,296 कर्मचारी संपावर ठाम असल्याने राज्यातील एसटी वाहतुकीला फटका बसला आहे. तर, 27,980 कर्मचारी संपातून माघारी येत पुन्हा कामावर रुजूही झाले आहेत.