महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. यंदा परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. अशातच दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट 18 फेब्रुवारीला दुपारी एक वाजेपासून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
परीक्षा मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दहावीची परीक्षा 15 मार्चपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन हॉल तिकिट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हॉल तिकीट 18 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजेपासून विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल. तर हॉल तिकीट शाळेकडून प्रिंट करून आणि प्राचार्यांची स्वाक्षरी आणि शाळेच्या शिक्क्यासह विद्यार्थ्यांना वितरित करावे, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तसेच शाळा-कॉलेजेसला या संदर्भात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास विभागीय मंडळाशी संपर्क साधवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
असं करा हॉल तिकीट डाऊनलोड
– सर्वप्रथम एसएससी बोर्डाचे अधिकृत संकेतस्थळ http://www.mahahsscboard.in उघडा.
– आता अपडेट्सवर क्लिक करून ‘डाऊनलोड महाराष्ट्र एसएससी हॉल तिकीट 2022’ ही लिंक ओपन करा.
– त्यानंतर एसएससी ’10 वी हॉल तिकीट 2022′ हा पर्याय निवडा.
– तुमचे एसएससी हॉल तिकीट पाहण्यासाठी तुमचा रोल नंबर, नाव किंवा नोंदणी क्रमांक, जन्मतारीख टाकून एंटर करा.
– त्यानंतर तुमचे हॉल तिकीट ओपन होईल.
– हॉल तिकीट डाऊनलोड करून प्रिंट घेवू शकतात.
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास झाले. काही ठिकाणी ऑफलाईन वर्ग देखील सुरू करण्यात आले होते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेबाबत भीती निर्माण झाली आहे. वार्षिक परीक्षेला सामोरे जाताना निर्माण होणारा ताण-तणावासाठी मार्गदर्शन आणि समुदेशन करण्यासाठी @scertmaha तर्फे प्रशिक्षित मार्गदर्शक आणि समुपदेशकांची सल्ला, मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मार्गदर्शक आणि समुपदेशकांची यादी https://maa.ac.in/index.php?tcf=counselors_list या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गेल्या आठवड्यात शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत.