उत्तर केरळ ते मराठवाडा दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ईशान्येकडील वाऱ्यांमुळे मराठवाडा आणि विदर्भात 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी तुरळक आणि हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. याच दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरड्या हवामानाची नोंद झाली आहे. परंतु आता राज्यात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील परभणी, बीड, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात आज काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
राज्यातील अकोला, भंडारा, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वाशिम, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ आणि वर्धामध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस किमान तापमानात कोणतेही बदल होणार नाहीत. परंतु त्यानंतर विदर्भातील तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होणार आहे. मात्र 25 फेब्रुवारीनंतर कोकणातील काही भाग वगळता तापमानात मोठी वाढ होईल. राज्याचा विचार केला तर राज्यातील गारठा कमी झाला आहे.