ताजी बातमी ऑनलाईन टीम
तेल, साबण, मंजनापासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंची किंमत गेल्या तीन महिन्यांत दोन वेळेस वाढल्या आहेत. आता पुन्हा तिसऱ्यांदा दरवाढीची (price increase) शक्यता वर्तवण्यात येत आहे. नोव्हेंबर आणि जानेवारीमध्ये दोन वेळेस भाववाढ केल्यानंतर FMCG, हेल्थकेअर, ब्युटी प्रॉडक्टस आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या (Electronics companie) पुन्हा एकदा दरवाढ करणार आहेत. महाग कच्चा माल (Raw material)आणि घटलेलं मार्जिनचं कारण पुढे करत कंपन्यांनी दरवाढीची तयारी केलीय.
गेल्या काही दिवसांपासून वस्तूंच्या किंमती वाढवण्यात चालढकल करण्यात आली. सणासुदीच्या काळात मागणी कमी होऊ नये यासाठी किंमती वाढवण्यात आल्या नाहीत. मात्र, आता दरवाढ अटळ आहे, असं कंन्जूमर इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड अप्लायंसेस मॅन्युफेक्चरर्स असोसियशनचे अध्यक्ष एरिक ब्रेगांजा यांनी सांगितलं. या तिमाहीत सर्वच वस्तूंच्या किंमतीत 5 टक्क्यानं वाढ होणार आहे. म्हणजेच उन्हाळा येण्याच्या अगोदरच कूलर आणि एसीच्या बाजारात गर्मी निर्माण होणार आहे. प्लास्टिक,स्टील आणि कॉपरचे दर वाढल्यानं कंपनी किंमतीमध्ये चार ते सात टक्क्यानं वाढ करणार असल्याचं ओरिएंट इलेक्ट्रिकचे व्यवसाय प्रमुख सलिल कपूर यांनी सांगितलंय.
एफएमसीजी कंपन्याही दरवाढ करणार
बिस्किट, नमकीन, तेल, साबण तयार करणाऱ्या एफएमसीजी कंपन्याही भाववाढीच्या रांगेत उभ्या आहेत. बिस्किट तयार करणारी ब्रिटानिया कंपनी चौवथ्या वेळेस दरवाढ करण्याच्या तयारीत आहे. मार्चपर्यंत बिस्कीटच्या किमतीमध्ये 10 टक्के दरवाढ होणार आहे. गहू, पाम तेल, साखरेच्या दरात वाढ झाल्यानं दरवाढ करण्याशिवाय कोणताच पर्याय उपलब्ध नाही. ब्रिटानिया कंपनीनं 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत 1 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 4 टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत 8 टक्के दरवाढ केलीय. म्हणजेच तर तीन महिन्यांना दरवाढ करण्यात येत आहे. दरवाढ केल्यामुळेच FMCG कंपन्याच्या वस्तूंची विक्री कमी झाली असतानाही नफा वाढलाय. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नात घट झाल्यानं मागणी कमी झालीये. कंपन्यांनी महागाईच्या झळा पोहचू नयेत यासाठी सर्वच वस्तूंच्या किंमती वाढवल्या आहेत. डाबरनं हनीटस, पुदीन हरा आणि चवनप्राशच्या किंमती 10 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. आता पुन्हा एकदा डाबरनं दरवाढीसाठी तयारी केलीय, अशी माहिती डाबर इंडियाचे सीईओ मोहिम मल्होत्रा यांनी दिलीय.
सौंदर्य प्रसाधनेही महागणार
सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तूंनाही महागाईची नजर लागलीय. पेट्रोकेमिकल्स संबंधित कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यानं जगातील सर्वात मोठी ब्युटी प्रॉडक्ट कंपनी L’Oreal ची डोकेदुखी वाढलीय. पहिल्या फेरीत गेल्या वर्षी कंपनीनं दरवाढ केली होती. आता दरवाढीची दुसरी फेरी यावर्षीच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल, असं L’Oreal India चे एमडी अमित जैन यांनी सांगितलंय. कंपनी सर्वच वस्तूंच्या दरात 5 ते 6 टक्क्यांनी वाढ करणार असल्याची माहिती समोर येत आहे. याचाच अर्थ खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधनं, स्वयंपाक घरातील सर्वच वस्तू महाग होणार असून, याची मोठ्याप्रमाणात झळ सर्वसामान्य लोकांना बसणार आहे.